ब्राह्मणांचे कसब पोवाडा -
लेखक - क्रांतीबा जोतीराव फुले.
चाल दुसरी
ब्राह्यण जोशी शूद्राच्या घरीं मूल जन्मलें म्हणजे येऊन कसा पैसा उपटितो याविषयी
॥ अभंग ॥
सोहोम कोहोस नाद इतक्यांत ॥
आला गृहतात जोशीबुवा ॥१॥
पुसे जन्मकाळ राशीचक्र मांडी ॥
चाळी बोटें कांडीं वेडा जैसा ॥२॥
न्याहाळुनी सर्व भोळया पित्या बोले ॥
मुळावरी आलें बाळ तुझ्या ॥३॥
कृत्रिम्याचे बोल पडतांच कानीं ॥
घाबरले मनीं विद्याहीन ॥४॥
माता बाळाकडे पाहुनिया रडे ॥
सर्व केले वेडे पाखांडयानें ॥५॥
पाहून ही संधि उपाय सुचवी ॥
जपास बसवी ब्राह्यणास ॥६॥
अनुष्ठानी दान ब्राह्यणांस करा ॥
आलें विघ्नवारा बसू नका ॥७॥
ग्रहधाक पीडा ह्यणे कर्ज काढूं ॥
भांडीकुंडी मोडूं सुखासाठीं ॥८॥
जप अनुष्ठान यथाविधि केला ॥
मूढ नागविला ग्रहमीर्षे ॥९॥
ताप येऊनीया तान्हे घाबरलें ॥
मृत्युपंथीं गेलें लागलेंच ॥१०॥
पुत्र उत्साहाच्या सुखसोहळ्याचा ॥
आनंद मुळीचा भंग केला ॥११॥
पोटें जाळूं नका लोकां फसवूनी ॥
देवा रागऊनी जोती म्हणे ॥१२॥
________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा